
प्रिय विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी व मान्यवर,
शिक्षण ही केवळ पुस्तकातील माहिती नसून जीवन घडविण्याची प्रक्रिया आहे. विद्यालय ही केवळ ज्ञान देणारी संस्था नसून संस्कारांचे मंदिर आहे. अशा या आपल्या विद्यालयास ११४ वर्षांची समृद्ध व गौरवशाली परंपरा लाभली आहे, याचा मला आणि संपूर्ण विद्यालय परिवारास मनस्वी अभिमान आहे.
सन १९११ मध्ये स्थापन झालेले हे विद्यालय आज भव्य इमारती, समृद्ध ग्रंथालय, आधुनिक संगणक प्रयोगशाळा, STEM LAB, डिजिटल क्लासरूम, प्रशस्त क्रीडांगण आणि सुसज्ज सभागृह अशा सर्व सुविधा लाभलेले एक केंद्र बनले आहे. काळाच्या गरजेनुसार प्रगत होताना देखील मूल्याधारित शिक्षणाची परंपरा आम्ही जपली आहे.
आमच्या विद्यालयाची विशेषता म्हणजे शैक्षणिक यशाची उज्ज्वल परंपरा. एस.एस.सी. व एच.एस.सी. निकालामध्ये विद्यार्थी दरवर्षी उत्तम प्रगती करतात. कला मराठी माध्यम, वाणिज्य व विज्ञान शाखेत इंग्रजी माध्यम उपलब्ध करून आम्ही विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम केले आहे.
पण आमची वाटचाल केवळ अभ्यासापुरती मर्यादित नाही. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आम्ही अनेक उपक्रम राबवतो.
- कला व संस्कृतीसाठी विवेक मासिक, कलावर्धिनी, चित्रकला ग्रेड परीक्षा मार्गदर्शन.
- पर्यावरणासाठी शाडूमातीच्या गणेशमूर्ती, प्रदूषणमुक्त दिवाळी, वृक्ष राखीबंधन.
- सांस्कृतिक परंपरेसाठी नागपंचमी, भोंडला, रक्षाबंधन, मातृ-पितृ पूजन, गुरुपूजन.
- क्रीडेसाठी लेझीम पथक, ढोल पथक, घोष पथक तसेच दररोज क्रीडावर्धिनी.
- शिस्त व सामाजिक जबाबदारीसाठी एनसीसी, स्काऊट, गाईड, आरएसपी.
- स्पर्धात्मक परीक्षांसाठी शिष्यवृत्ती, ज्ञानवर्धिनी, NMMS, TMV परीक्षा तसेच डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा.
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना जागवून त्यांना आत्मविश्वास देणे हीच आमची खरी कामगिरी आहे. आज आमचे अनेक माजी विद्यार्थी देशाच्या विविध क्षेत्रात—शिक्षण, विज्ञान, उद्योग, कला, क्रीडा, प्रशासन या सगळीकडे—यशस्वीपणे कार्यरत आहेत. त्यांच्या यशात आमच्या विद्यालयाच्या संस्कारांचा वाटा आहे, हीच खरी आमची शान आहे.
प्रिय विद्यार्थ्यांनो, तुम्ही आमच्या विद्यालयाची खरी शान आणि ताकद आहात. तुमच्या हातून फुलणारी प्रगती हीच आमच्या प्रयत्नांची खरी फलश्रुती आहे. तुम्ही शिक्षणासोबतच चारित्र्य, प्रामाणिकपणा, कष्टाची तयारी, समाजसेवेची वृत्ती या गुणांचा अंगीकार करा. हे विद्यालय तुमच्यासाठी उघडे आकाश आहे—तुम्ही इथून उंच भरारी घ्या आणि समाजाचा, राष्ट्राचा मान वाढवा, हीच आमची मनोकामना आहे.
आज आपल्या विद्यालयास ११४ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभली आहे. काळानुरूप सुविधांचा विकास, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय, STEM LAB, क्रीडांगण, सांस्कृतिक विभाग, पर्यावरणपूरक उपक्रम अशा अनेक क्षेत्रांत विद्यालय सातत्याने प्रगती करत आहे. या विकासाला आपला हातभार मिळणे अत्यंत गरजेचे आहे.म्हणूनच आपण सर्व माजी विद्यार्थ्यांना मनःपूर्वक आवाहन— विद्यालयाच्या प्रगतीसाठी आपण देणगी स्वरूपात सहकार्य करावे.देणगी ही आपणास जशी सोयीस्कर असेल तशी रक्कम, साहित्य, शैक्षणिक साधने, तंत्रज्ञान, पुस्तके किंवा इतर कोणत्याही प्रकारे देता येईल.आपल्या छोट्या-मोठ्या योगदानातूनही अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकेल.
आपण दिलेल्या मदतीचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक उन्नतीसाठी, आधुनिक सुविधा उभारण्यासाठी व विविध उपक्रम राबविण्यासाठी केला जाईल.
माजी विद्यार्थ्यांनी दिलेला प्रत्येक हातभार हा या विद्यालयाचा दीप अधिक तेजोमय करेल.
आपण सारे मिळून विद्यालयाचा गौरव वर्धिष्णु करूया, हीच आमची अपेक्षा.
प्रिय विद्यार्थ्यांनो, तुमच्या यशातच आमचे यश दडलेले आहे. तुम्ही या विद्यालयाच्या परंपरेला पुढे नेत राहा, हाच आमचा विश्वास व आशिर्वाद.
आपल्या सर्व पालक, शिक्षक, कर्मचारी व माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य हेच या विद्यालयाच्या यशामागचे खरे कारण आहे. आपण सारे मिळून या संस्थेचा दीप अधिक तेजोमय करुया.
आपला,
मुख्याध्यापक
श्री धनंजय मेळकुंदे
