“उधाणलेल्या आव्हानांतूनच यशाचा किनारा गाठता येतो — श्री. तुषार लुंकड.”
बुधवार दि. २९ जुलै, २०२६. बारामती : “शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी घडवू शकत नाही; त्यासाठी समुद्रही उधाणलेला असावा लागतो,” असे प्रेरणादायी प्रतिपादन प्रशालेचे माजी विद्यार्थी तथा उद्योग निरीक्षक मा. श्री. तुषार लुंकड यांनी केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कै. ग. भि. देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बारामती येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी ‘गुणगौरव’ समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
संस्थेचे नियामक मंडळ सदस्य व शाळा समिती अध्यक्ष मा. अजय पुरोहित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात दहावी व बारावीच्या विविध शाखांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणारे तसेच राज्य शिष्यवृत्ती परीक्षा व एन.एम.एम.एस., तसेच प्राथमिक विभागातील मंथन परीक्षेत यशस्वी ठरलेल्या एकूण ७० गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यंदा विद्यालयाचा दहावीचा निकाल ९७.७८ टक्के, बारावी कला शाखेचा ८२.६० टक्के, वाणिज्य शाखेचा ९५.४५ टक्के, तर विज्ञान शाखेचा १०० टक्के लागला. नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या तसेच मंथन परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे मा. श्री. तुषार लुंकड यांनी मनोगतात सांगितले की, “काळ बदलला, भूमिका बदलल्या; परंतु ज्या शाळेत विद्यार्थी म्हणून घडलो, त्याच शाळेत आज प्रमुख अतिथी म्हणून येण्याचे भाग्य लाभणे हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक क्षण आहे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, सातत्य, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर स्वतःबरोबरच शाळा व पालकांचे नाव उज्ज्वल करावे.”
प्रशालेचे महामात्र मा. डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी गुरुपौर्णिमा आणि गुणगौरव समारंभाचा योग विशेष असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय यशाबरोबरच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्येही उल्लेखनीय कामगिरी करून संस्थेचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन केले. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत युवकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय समारोपात मा. श्री. अजय पुरोहित यांनी, “यश हा प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे; तो अंतिम पूर्णविराम नाही,” असे सांगत विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून आदर्श, ज्ञान आणि योग्य कृती यांच्या साहाय्याने राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग यांनी केले. यावेळी प्रशालेचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, शाळा समन्वयक पुरुषोत्तम कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका सविता हिले, पूर्वप्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनिता तावरे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दत्तात्रय लखे, पर्यवेक्षक श्याम नांगरे व संदीप पवार पर्यवेक्षिका सौ.सुजाता पांडकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संतोष शेळके यांनी केले, तर आभार श्री. रवींद्र गडकर यांनी मानले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रसंत ज्ञानेश्वर माउलींच्या ‘पसायदान’च्या सामूहिक गायनाने भक्तिमय वातावरणात झाली.

